नवी दिल्ली, 19 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षेसाठी चुकीची कागदपत्रे दिल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) तपासणीत समोर आले आहे. पूजा खेडकर यांनी त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे आणि आईचे नाव, त्याचे फोटो, स्वाक्षरी, त्याचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता तसेच ओळख बदलून परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्याचे या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोबतच त्यांनी पूजा खेडकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद केली आहे. याची माहिती यूपीएससीने दिली आहे.
https://x.com/ANI/status/1814220605111283747?s=19
कारणे दाखवा नोटीस बजावली
पूजा खेडकर यांनी परीक्षेत चूकीची माहिती दिल्याबद्दल नागरी सेवा परीक्षा 2022 मधून त्यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी आणि भविष्यातील परीक्षांपासून दूर ठेवण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची नागरी सेवा परीक्षेतील उमेदवारी रद्द का करावी? आणि त्यांना आगामी यूपीएससी परीक्षांमधून का काढून टाकले जाऊ नये? असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. याचे उत्तर आता पूजा खेडकर यांना द्यावे लागणार आहे.
यूपीएससी ने काय म्हटले?
या प्रकरणाच्या तपासानंतर आम्ही पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. आपल्या घटनात्मक दायित्वांची पूर्तता करताना यूपीएससी आपल्या घटनात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करते. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करणे ही आमची जबाबदारी आहे. यूपीएससीने अत्यंत निष्पक्षतेने आणि नियमांचे काटेकोर पालन करून सर्व परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य आणि अखंडता सुनिश्चित केली आहे. यूपीएससीने जनतेचा विशेषतः उमेदवारांचा विश्वास आणि विश्वासार्हता योग्यरित्या मिळवली आहे. हा विश्वास आम्ही मिळवला आहे. लोकांचा हा विश्वास अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.