बारामती, 12 जानेवारीः(प्रतिनिधी- दिलीप खरात) बारामतीच्या तहसिल विभागात अनोगोंदी कारभार दिसून येत असून या ठिकाणी अनधिकृतपणे काही लोक महसूल कर्मचारी असल्याचा वाव आणत जनसामान्य लोकांची विविध कामासाठी अर्थिक लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. सरकारी टेबलवर बसणाऱ्या खासगी व्यक्तींना त्याच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याच्या वर कमाईत आर्थिक समभाग असल्याचे समजत आहे. या सर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
तर काही सामान्य व्यक्ती रेशन कार्डसंदर्भात पुरवठा विभागात गेल्यास अपुऱ्या कागदपत्रामुळे अधिकारी वर्गाकडून माघारी पाठविण्यात येते. मात्र यावेळी तेथील टेबलवर काम करणारे खासगी लोक अधिकाऱ्यांची नजर चुकवून या लोकांचा पाठलाग करून, ‘माझ्याकडे एवढे पैसे व कागदपत्रे द्या, मी तुमचे काम करून देतो’ असे सांगण्यात येते. यामुळे पुरवठा विभागात अपुरी कागदपत्रे असले तरी देखील पैशांच्या जोरावर कामे करून दिली जात आहेत. याचा असंख्य नागरिकांना रेशन कार्डसाठी आर्थिक लूटमार होत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेल्या नागरिकांनी माहिती दिली आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाची तात्काळ चौकशी करून, अशा खासगी कर्मचाऱ्यांना वेसण घालण्याची नितांत गरज भासू लागली आहे.
बारामतीमधील हातभट्टी हद्दपार? रासायनिक दारूच्या विळख्यात तालुका!
प्रशासकीय भवनातील पुरवठा विभागात रेशन कार्डच्या विविध कामांसाठी हजारो रुपये उकळले जात असल्याच्या अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. तर पुरवठा विभागात शासकीय नेमणूक नसताना देखील खासगी व्यक्तीला अनधिकृतपणे टेबलवर काम करण्यासाठी परवानगी दिली जात असल्याचे समोर आले आहे. पुरवठा विभागात सर्वसामान्य नागरिकांची लुटमार केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तर पुरवठा विभागात किरकोळ कामकाजासह रेशनकार्ड काढण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून सर्वसामान्य लोकांकडून हजारो रुपये घेतले जातात. यामुळे बारामतीच्या प्रशासकीय भवनात सध्या भोंगळ कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे.
पुरवठा विभागात सर्वसामान्य व्यक्ती तालुक्याच्या काना-कोपऱ्यातून रेशनिंगचे विभक्त, दुबार, नाव कमी करणे, नाव वाढविणे यासाठी कामे घेऊन येत असतात. मात्र, कमी खर्चात होणाऱ्या कामांसाठी हजारो रुपये लुटले जातात. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. तर जे पैसे देतील, त्या नागरिकांना तातडीने रेशन कार्डाची कामे करून दिली जातात. तर पैसे न देणाऱ्या नागरिकांना जाणीवपूर्वक खेटे घालण्यासाठी भाग पाडले जात आहे. यामुळे आता सर्वसामन्य जनतेची हेळसांड व लुटमार करणाऱ्यांना जरब बसण्यासाठी अधिकारी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागून आहे.
बारामतीत कृषिक 2023 चे आयोजन
अनेक एजंट हाताशी धरून उकळे जातात हजारो रुपयेः
पुरवठा विभागात एजंटगिरी वाढली असून रेशनकार्ड संदर्भात विविध कामे घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे, कमीत कमी खर्चात होणाऱ्या कामासाठी हजारो रुपये घेण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच काही एजंट लोकांना हाताशी धरून रेशनकार्ड काढण्यासाठी पुरावा नसल्यास देखील अधिकचे पैसे घेऊन रेशनकार्ड काढून दिले जातात, यामुळे पुरवठा विभागात काम करणाऱ्यांची चांगलीच चंगळ होत आहे. मात्र, आपल्याकडे पुरावे नसल्याने रेशनकार्ड मिळत असल्याने सर्वसामान्य व्यक्तींना अधीकचे पैसे मोजावे लागतात. अधिक पैसे देऊन आपली कामे होत असल्याने काही नागरिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत नाहीत. यामुळे आमची आर्थिक लूटमार कधी थांबणार? असा सवाल दबक्या आवाजात नागरिक करू लागले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक सरोदे यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
2 Comments on “बारामतीच्या तहसिल कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूटमार”