नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असणार आहे. तर मोदी सरकारच्या कार्यकाळातील त्यांचा हा दुसरा शेवटचा अर्थसंकल्प असेल. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची मंजुरी घ्यावी लागते. यासाठी निर्मला सीतारामन यांनी आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
https://twitter.com/ANI/status/1752917226083192920?s=19
मोठ्या घोषणा होण्याची शक्यता
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काही मोठ्या घोषणा करू शकतात. यामध्ये केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेअंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यातून 6 हजार रुपये मिळतात. तसेच या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तरूण, महिला, गरीब आणि शेतकरी यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे देशवासीयांच्या नजरा लागल्या आहेत.
अर्थसंकल्पाकडे देशवासीयांच्या नजरा!
या अर्थसंकल्पात देशातील गरिबांसाठी सामाजिक कल्याणकारी योजना तसेच तरूणांसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाऊ शकतो. सोबतच केंद्र सरकार या अर्थसंकल्पात महिलांसाठी देखील कल्याणकारी योजना आणण्याची शक्यता आहे. तसेच आगामी लोकसभा पार्श्वभूमीवर, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशातील करदात्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पामध्ये कर प्रणालीत काही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पात करामध्ये सवलत मिळते की नाही? याकडे देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.