मुंबई, 29 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. तत्पूर्वी, राष्ट्रवादीने नवाब मलिक यांची उमेदवारी आज दुपारपर्यंत जाहीर केली नव्हती. त्यामुळे नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिल्याने नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार बनले आहेत.
https://x.com/ANI/status/1851202137927409716?t=5lYkNKAEq9ZtrLLJQ7a8Ew&s=19
नवाब मलिक यांनी मानले आभार
एबी फॉर्म मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे आभार मानले आहेत. “आज मी मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी मी अपक्ष म्हणून उमेदवारीही दाखल केली होती. परंतु, पक्षाने मला एबी फॉर्म पाठवला. आम्ही तो फॉर्म दुपारी 2.55 वाजता जमा केला. त्यामुळे आता मी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे. याबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा मी मनापासून आभारी आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे की मला मोठ्या संख्येने मतदार नक्कीच साथ देतील. मला विश्वास आहे की यावेळी मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून मी नक्कीच विजयी होईल,” असे नवाब मलिक यावेळी म्हणाले.
अबु आझमी यांच्याशी लढत
दरम्यान, नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, नवाब मलिक यांच्यावर गेल्या काळात अनेक आरोप झाल्यामुळे भाजपने नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने अणुशक्तीनगर मध्ये नवाब मलिक यांच्या जागी त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर की अपक्ष लढणार? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर याचे उत्तर आज मिळाले. नवाब मलिक हे आता मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात नवाब मलिक यांचा सामना समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार अबु आझमी यांच्याशी होणार आहे. दरम्यान, अबू आझमी हे मानखुर्द शिवाजी नगर मधील विद्यमान आमदार आहेत.