चेन्नई, 26 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजल्यापासून खेळवला जाईल. काही दिवसांपूर्वी या दोन संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना झाला होता. या सामन्यात कोलकत्याने हैदराबादचा 8 विकेटने पराभव केला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून आयपीएल 2024 च्या स्पर्धेचे विजेतेपद कोणता संघ पटकावणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/IPL/status/1794330780577227141?s=19
आज दोन्ही संघात टक्कर!
पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी करीत हैदराबादच्या 3 फलंदाजांना बाद केले होते. त्यामुळे स्टार्कच्या गोलंदाजीचे मोठे आव्हान सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांसमोर असणार आहे. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात देखील सनरायझर्सच्या टॉपच्या फलंदाजांना फारसे काही करता आले नव्हते. त्यामुळे हैदराबाद संघातील सलामीचे फलंदाज आजच्या सामन्यात कशी कामगिरी करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे कोलकात्याचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. परंतु त्यांचा सलामीवीर फिल सॉल्ट हा मायदेशी गेल्यामुळे त्यांच्या फलंदाजीवर थोडाफार परिणाम होण्याची शक्यता आहे. फिल सॉल्टच्या जागी सध्या रहमानउल्ला गुरबाज हा सलामीला येत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघातील मधल्या फळीतील फलंदाज एडन मार्कराम सध्या खराब फॉर्मातून जात आहे. अशावेळी हैदराबादचा संघ त्याच्याजागी दुसऱ्या एखाद्या खेळाडूला संधी देण्याची शक्यता आहे.
पाहा हेड टू हेड रेकॉर्ड?
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 26 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये कोलकात्याने 17 सामने जिंकले, तर हैदराबादने 9 सामन्यांत विजय मिळवला आहे. या दोन्ही संघात झालेल्या यापूर्वीच्या 2 सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दोन्ही वेळा विजय मिळवला होता. यामध्ये साखळी फेरीतील सामना कोलकत्याने 4 धावांनी जिंकला. त्यानंतर पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकत्याने हैदराबादचा 8 विकेट राखून पराभव केला होता.
चेपॉकची खेळपट्टी कोणाला फायदेशीर?
आजचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेपॉक स्टेडियमवर 8 सामने खेळविण्यात आले. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सहा सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जो संघ नाणेफेक जिंकेल तो संघ प्रथम फलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे.