ठाणे, 28 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.28) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे उपस्थित होते. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना ठाणे शहरातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
https://x.com/mieknathshinde/status/1850847646899994828?t=w7RPliQS5CKayTwzmo2JoA&s=19
https://x.com/mieknathshinde/status/1850873101640151514?t=38e9qxZNHv3yQmDhhW-JIg&s=19
फडणवीस यांचा रॅलीत सहभाग
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी औक्षण केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंदआश्रमात जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. तसेच त्यांनी यावेळी वागळे इस्टेट येथील दत्त मंदिरात जाऊन श्री दत्त गुरूंचे दर्शन घेतले. त्यानंतर कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिघे विरुद्ध शिंदे सामना
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांच्याशी होणार आहे. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आणि एकनाथ शिंदे यांचे गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दिघे विरुद्ध शिंदे असा सामना पहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान, कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदे या मतदारसंघात 2009 पासून आमदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.