राज्यात पोलीस भरतीसाठी 19 जूनपासून मैदानी चाचणी परीक्षा; महाराष्ट्र पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई, 17 जून: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी राज्यभरात मैदानी चाचणी परीक्षा 19 जूनपासून सुरू होणार आहे. पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई या पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. दरम्यान, एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल, तर अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

https://x.com/DGPMaharashtra/status/1802368592970952941?s=19

पोलीस दलाच्या सूचना

दरम्यान, एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना एकाच दिवशी किंवा सलग दुसऱ्या दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर रहावे लागते. त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, ज्या उमेदवाराला एकाचवेळी दोन पदांकरिता वेगवेगळ्या ठिकाणी मैदानी चाचणीस हजर राहण्याची सूचना दिली असेल, अशा उमेदवारांना पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी हजर राहण्यासाठी वेगळी तारीख देण्यात यावी, अशा सूचना सर्व घटक प्रमुखांना आणि एमएएचएआयटी विभागाला देण्यात आल्या आहेत.

काही शंका असल्यास संपर्क साधावा

मात्र, याकरिता संबंधित उमेदवारांना तो पहिल्या मैदानी चाचणीला हजर होता, याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागणार आहेत. पोलीस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत. तसेच त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल, अशा उमेदवारांना किमान 4 दिवसाच्या अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. तर उमेदवारांना या परीक्षेसंदर्भात काही अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org या ईमेलवर संपर्क करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *