जालना, 24 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावली होती. या बैठकीला राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्यात येणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला प्रत्येक गावातून उमेदवार उभा करू नका, असे म्हटले आहे.
तर मते फुटतील!
आपण जर लोकसभेला एकाचवेळी जास्त फॉर्म भरले तर मतांचे विभाजन होईल, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. असे केल्याने मराठा समाज अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे एका जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करता येईल. हा उमेदवार अपक्ष म्हणून उभा करा आणि त्याला निवडून आणा. मात्र, यासंदर्भातील निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत नाही तर विधानसभेत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. वरील मुद्द्यावर गावागावात बैठका घ्याव्या आणि त्यासंदर्भात 30 तारखेला पुढील दिशा ठरविण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मराठ्यांची ताकद दाखवा
राजकारण माझा मार्ग नाही यामध्ये मला अडकवू नका, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. “मराठा समाजाचे 17 ते 18 मतदारसंघावर वर्चस्व आहे. मराठा समाजाने कोणत्याही प्रचार सभेला जाऊ नये. तसेच कोणत्याही पक्षाचा प्रचार करू नये. या निवडणुकीत मराठा समाजाने 100 टक्के मतदान करावे. मराठ्यांची ताकद दाखवायची हीच वेळ आहे,” असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.