बारामती, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात एका कारचा भीषण अपघात झाला आहे. यात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत. ते सर्वजण बारामती येथील एका खासगी विमान अकादमीचे प्रशिक्षणार्थी वैमानिक आहेत. बारामती-भिगवण रोडवर जैनिकवाडी गावाजवळ आज (दि.09) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातावेळी ते चौघेही मद्यधुंद अवस्थेत होते. यादरम्यान, कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार पलटी झाली. अशी प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. या अपघाताचा सध्या पोलीस तपास सुरू आहे.
https://x.com/ANI/status/1866010830648811786?t=dZr3QUgGE5naCXH___323w&s=19
दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
या कारमध्ये एकूण चार प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. यामध्ये एका तरूणीचा देखील समावेश असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ते चौघे आज पहाटेच्या सुमारास कारमधून बारामतीहून भिगवणकडे चालले होते. मात्र, त्यावेळी बारामती भिगवण रोडवरील जैनिकवाडी गावाजवळ त्यांच्या कारचा अपघात होऊन त्यांच्या कारची पलटी झाली. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, टाटा हॅरिअर कंपनीची ही कार आहे. या अपघातावेळी चौघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती कार उलटली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या अपघाताचा पुढील तपास सध्या पुणे ग्रामीण पोलीस करीत आहेत.