जालना, 20 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि.20) सकाळी हा अपघात झाला. ही एसटी बस गेवराईवरून जालन्याकडे जात होती. त्यावेळी जालना-वडीगोद्री रोडवरील शाहपूरजवळ ही घटना घडली. या अपघातानंतर जखमींना तातडीने अंबड आणि जालना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
https://x.com/PTI_News/status/1837018573245391286?s=19
https://x.com/airnews_mumbai/status/1837016908056379524?s=19
आठ जणांचा मृत्यू
जालना-वडीगोद्री मार्गावर आज सकाळी गेवराईवरून जालन्याकडे जाणाऱ्या एसटी बसची आणि जालन्याहून येणारा आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. हा ट्रक संत्र्यांनी भरलेला होता. या भीषण अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बसमधील 6 आणि ट्रकमधील 2 जणांचा समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यामुळे या दोन्ही वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या अपघातानंतर या ट्रकमधील संत्र्या रस्त्यावर पडल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच स्थानिक लोक देखील याठिकाणी जमा झाले. यावेळी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून त्यांना अंबड आणि जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
https://x.com/dhananjay_munde/status/1837011131187306636?s=19
धनंजय मुंडेंनी वाहिली श्रद्धांजली
या घटनेबद्दल राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. “गेवराईवरून जालन्याकडे जात असलेल्या एस टी बस व संत्र्याच्या ट्रकचा भीषण अपघात होऊन बसमधील 6 तर ट्रक मधील 2 अशा एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्दैवी अपघातातील जखमींना अंबड व जालना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्व जखमींना लवकरात लवकर आराम मिळो, ही प्रार्थना,” असे धनंजय मुंडे यांनी यामध्ये म्हटले आहे.