बारामती, 18 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ‘कृषिक 2024’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे आयोजन ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषिक प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी कर्नाटकचे कृषीमंत्री एन चेलुवरायस्वामी, प्रतापराव पवार, राजेंद्र पवार, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डाॅ. जावकर, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे पदाधिकारी शेतकरी आदी उपस्थित होते.
दावोस करारातील किती प्रकल्प महाराष्ट्रात येतात? हा खरा प्रश्न: सुप्रिया सुळे
काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दावोस पेक्षाही मोठा कार्यक्रम येथे होत असल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी यावेळी समाधान व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांच्या दावोस दाैऱ्यातील भरमसाठ खर्चावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. दावोसमध्ये जेवढे करार होतात. त्यातील किती प्रकल्प प्रत्यक्षात महाराष्ट्रात येतात? हा खरा प्रश्न आहे. पण कृषिक मध्ये ज्या गोष्टी होतात वास्तवाशी निगडीत असतात. कारण ही कृषी विज्ञान केंद्राच्या टीमची ताकत आहे. ज्या काळात कोणीही आर्टिफिशल इंटेलिजेन्सबद्दल बोलत नव्हते. त्या काळात आदरणीय पवार साहेब, प्रतापराव पवार यांनी डाॅ. जावकरांना सोबत घेऊन देशातील पहिला कृषीवर आधारीत आर्टिफिशल इंटेलिजेन्स प्रकल्प बारामती सुरु केला. ही फारच अभिमानाची गोष्ट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे.
बेळगावचा प्रश्न सोडला तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचे चांगले संबंध: सुप्रिया सुळे
एआयची पहिली लॅब विद्या प्रतिष्ठानमध्ये सुरु करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने देशात तीन लॅब सुरु करण्याची घोषणा केली. ही आपल्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या नात्यांना उजाळा दिला. बेळगावचा मुद्दा सोडला तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचे नेहमीच चांगले संबंध राहिले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच “आज शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे योग्य वेळ, योग्य पीक आणि योग्य नफा यासाठी एआयच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी मायक्रोसाॅफ्ट देखील मदत करणार आहे. त्यातुन शेतीचे योग्य नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात कृषी क्षेत्रात क्रांती होईल,” असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
दुष्काळ आणि अतिवृष्टी यांत सुवर्णमध्य साधून काम करायचेय: सुप्रिया सुळे
“आज महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे तर काही भागात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे याचा सुवर्णमध्य साधून आपल्याला काम करायचे आहे. या कृषिकचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या कृषिकच्या टीमचे सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले.