बारामती, 14 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड येथे महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालय यांच्या मान्यतेने रेशीम कोष खरेदी विक्री खुली बाजारपेठ केंद्र सुरू आहे. रेशीम कोष मार्केट मध्ये ई-नाम द्वारे ऑनलाईन पद्धतीने लिलाव होत असल्याने योग्य दर, अचूक वजन, वेळेत व खात्रीशीर पेमेंट मिळत असल्याने रेशीम कोष मार्केट मध्ये पारदर्शक व्यवहार होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची विश्वासार्हता वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना वेळेत ऑनलाईन पेमेंट मिळत असल्याने परिसरातील व आसपासच्या जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी बारामती मार्केट मध्ये कोष विक्रीस आणत आहेत.
बाजार समितीचे आवाहन
परंतु, खुली बाजारपेठ विक्री व्यवस्था असताना ही काही खरेदीदार परस्पर अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून परस्पर दर ठरवून कोष खरेदी करीत आहेत असे निदर्शनास आले आहे. सदरची बाब ही समितीचे कायद्याचे दुष्टीने बेकायदेशीर आहे. तसेच परस्पर खरेदी व्यवहारामध्ये योग्य दर देत नसल्याचे व वजनात कपाती, कडती यांसारख्या गोष्टी घडत असल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या आहेत तसेच येत आहेत. कोषास योग्य दर आणि अचूक वजन न देणे तसेच वेळेत पेमेंट न करणे इत्यादी मार्गाने व परस्पर खरेदी मुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समितीचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कोष बाहेरील खरेदीदारास देऊ नये. आपला कोष बारामती मार्केट मध्येच विक्रीस आणावा, असे आवाहन बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
अन्यथा कायदेशीर कारवाई…
रेशीम कोष हा शेतमाल शासनाने नियमनात आणला असल्याने याचा समाविष्ठ बाजार समितीच्या नियमनात येत आहे. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 कलम 32 अ अन्वये लायसन्स धारक व अनधिकृत खरेदीदार यांनी परस्पर माल खरेदी करू नये, विना परवाना व परस्पर माल खरेदी करणे बेकायदेशीर आहे. असा प्रकार आढळून आल्यास सदरचा कोष वाहनासह जप्त करण्यात येईल आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कृपया याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असा इशारा बाजार समितीने दिला आहे.
लायसेन्स काढण्यासाठी संपर्क करा
तसेच ज्यांना रेशीम कोष खरेदी करायचे आहेत. त्यांनी परवाना घेण्यासाठी बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यासाठी 5 हजार रुपयांची लायनेन्स फी डिपॉझिट, अर्ज, साधार कागदपत्रे घेऊन लायसेन्स देण्यात येईल. तरी रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी आपला माल बारामतीच्या रेशीम कोष मार्केट मध्ये विक्रीस आणावा असे आवाहन बारामती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, उपसभापती निलेश लडकत आणि सचिव अरविंद जगताप यांच्या तर्फे करण्यात आले आहे.