बारामती, 24 ऑगस्टः निरा डाव्या कालव्याचे काँक्रिटीकरण (अस्तरीकरण) करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकरी आग्रही आहेत. तर याच कालव्यावर अस्तरीकरणासाठी बारामतीचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आज (बुधवारी) 24 ऑगस्ट 2022 रोजी इंदापूरचे शेतकरी एकत्र येऊन अस्तरीकरणाला पाठिंबा देणार आहेत.
निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम थांबवा- अजित पवार
इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नीरा डावा कालवा वरदान ठरला आहे. कालवा जुना झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. तसेच सायफनद्वारे ही पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होती. नीरा डाव्या कालव्यालगत अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून विहिरीसाठी जागा खरेदी केल्या आहेत. कालव्यालगत विहिरी खोदून कालव्याचे पाणी 5 ते 10 किलोमीटर लांबीपर्यंत उचलून नेले आहे. कालवा सुरू असताना सायफनद्वारे पाण्याची चोरी होते.
उन्हाळ्यामध्ये 827 क्युसेक वेगाने सुरू होणारे पाणी इंदापूर तालुक्यामध्ये 59 क्रमांकाच्या वितरिकेला 125 ते 150 क्युसेक वेगाने पोहचत आहे. तर 677 ते 700 क्युसेक पाण्याची गळतीसह चोरी होत असते. शासानाने पहिल्या टप्प्यामध्ये 30 किलोमीटर लांबीमध्ये कालव्याचे अस्तरीकरण सुरू केले असून, याला बारामती तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र इंदापूर तालुक्यातील शेतकरी काँक्रिटीकरणला पाठिंबा देण्यासाठी एकवटणार आहे.
शेतकऱ्यांनी नीरा डावा कालवा काँक्रिटीकरण समिती तयार केली आहे. समितीच्या माध्यमातून सध्या इंदापूर तालुक्यातील जनजागृती मोहिम सुरू आहे. काँक्रिटीकरणामुळे कालव्याची वहन क्षमता वाढणार आहे. इंदापूर तालुक्यातील दोन अर्वतनामधील कालावधी कमी होणार आहे. पाण्याचा अपव्यय टळणार असून उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना वाढीव आवर्तन ही मिळणार आहे.