काठमांडू, 29 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला कोर्टाने एका बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. नेपाळच्या काठमांडू जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तर गुन्ह्याच्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन नव्हती, असेही कोर्टाने यावेळी म्हटले आहे. यापूर्वी ही पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे म्हटले जात होते. आता याप्रकरणी संदीप लामिछाने याला कोर्टाने दोषी ठरवले आहे. मात्र त्याला कोर्टाने अद्याप शिक्षा सुनावली नाही.
https://x.com/ANI/status/1740729940738482292?s=20
दरम्यान गेल्या वर्षी संदीप लामिछाने विरोधात 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात पीडित मुलीने तक्रार केली होती. त्यावेळी संदीप लामिछाने हा कॅरेबियन प्रीमियर लीग खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला गेला होता. काही दिवसांनी पोलिसांनी त्याला काठमांडू येथे अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने त्याचा जामीन मंजूर मंजूर केला होता. यादरम्यान तो नेपाळच्या राष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळत होता. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने संदीप लामिछानेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्याचवेळी त्यांनी त्याच्याकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले होते.
संदीप लामिछाने याला आता बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे क्रिकेट करियर धोक्यात आले आहे. तो नेपाळचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. दरम्यान, संदीप लामिछाने हा फिरकी गोलंदाज असून त्याने नेपाळकडून 51 एकदिवसीय आणि 52 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदिवसीय सामन्यात 112 विकेट्स आणि टी-20 मध्ये 98 विकेट घेतल्या आहेत. तसेच तो आयपीएल मध्ये यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून देखील खेळलेला आहे.