फेसबुक आणि इंस्टाग्राम तब्बल दीड तास डाऊन! जगभरातील वापरकर्त्यांच्या तक्रारी

पुणे, 05 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) जगभरात आज रात्री फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही ॲपचा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे काही काळासाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामॲप बंद झाले होते. जवळपास दीड तासानंतर हे दोन्ही ॲप पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तत्पूर्वी, साधारणतः रात्री साडेआठच्या सुमारास फेसबुक वापरकर्त्यांचे खाते आपोआप लॉग आउट झाले होते. त्यामुळे आपले खाते हॅक वगैरे झाले आहे की काय? अशी भीती फेसबुक वापरकर्त्यांना वाटत होती. जगभरातील फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना ही समस्या येत होती.

जगभरातील नेटकऱ्यांना अडचणी

यासंदर्भात, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या लाखो वापरकर्त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे ट्विटरवर सध्या फेसबुक डाऊन आणि इंस्टाग्राम डाऊन हे सध्या ट्रेण्ड करीत आहे. इंस्टाग्राम बाबत बोलायचे झाल्यास सर्व्हर डाऊनमुळे इंस्टाग्राम वापरकर्त्यांना नवीन फीड रिफ्रेश करता येत नव्हते. तसेच त्यांना रिल्स देखील दिसत नव्हते. याशिवाय स्टोरी आणि पोस्ट शेयर करण्यास देखील अडचणी येत होत्या. त्यामुळे इंस्टाग्राम वापरकर्ते देखील चिंताग्रस्त झाले होते.

यापूर्वीही बंद पडले होते!

त्यानंतर मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत ट्विट करून महिती दिली होती. काही काळजी करू नका, काही मिनिटे थांबा, सर्व समस्या सोडविण्यात येतील. असे ट्विट मार्क झुकरबर्ग यांनी केले होते. त्यानुसार, इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही ॲप आता पुन्हा एकदा सुरुळीत झालेले आहेत. दरम्यान, इंस्टाग्राम आणि फेसबुकचे सर्व्हर डाऊन होणे हे काही नवीन नाही. यापूर्वी, फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना अनेकदा अशा प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप 6 तासांसाठी अचानकपणे बंद झाले होते. तेंव्हा जगभरात एकच खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *