मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई, 03 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यातही नावनोंदणी सुरू राहणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अद्यापही नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.

https://x.com/iAditiTatkare/status/1830635318887821394?s=19

1.60 कोटींहून अधिक महिलांना झाला लाभ

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता दिली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना लागू केल्यानंतर राज्यातील महिलांनी या योजनेला तुफान प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्य सरकारची ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आतापर्यंत 1 कोटी 60 लाखांहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर राज्यातील आणखी एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातील अध्यादेश राज्य सरकारने नुकताच जारी केला आहे.

दर महिन्याला 1500 रुपये मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी 60 लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील 3000 रुपयांचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्य सरकारने https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवी वेबसाईट सुरू केली आहे. तसेच नारी शक्तीदूत या मोबाईल ॲपवरून देखील महिलांना घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *