इंदापूर, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या टोळीचा इंदापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांचे सोन्या चांदीचे दागिने, पैसे आणि महागड्या वस्तू चोरल्याप्रकरणी एका तरूणासह दोन महिलांना इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांच्या टोळीने राज्यभरात अनेक ठिकाणी चोरी केली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. यासंदर्भात एका महिलेने पोलिसांत तक्रार केली होती.
या चोरट्यांनी इंदापूर शहरातील एका सराफाच्या दुकानात तक्रारदार महिलेचे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास केले होते. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी त्यांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. या तपासणीत एका तरूणासह दोन महिलांनी चोरी केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना रविवारी जेजुरी येथे अटक केली.
दरम्यान, रविवारच्या दिवशी जेजुरी येथे खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्यासाठी हे तिघे चोर जेजुरीत आले होते. त्यावेळी त्यांना इंदापूर पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून तक्रारदार महिलेचे मंगळसूत्र आणि चोरी करण्यासाठी वापरलेली कार जप्त केली आहे. सध्या या चोरट्यांची पोलीस चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.