भंडारा, 25 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर भागातील आयुध कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये मृतांची संख्या 8 वर पोहचली आहे. या स्फोटानंतर 13 कामगारांना दुर्घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले. त्यातील 8 कामगारांचा मृत्यू झाला असून, 5 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटामुळे या कारखान्याचे छत कोसळले. या ढिगाऱ्याखाली काहीजण सापडले होते. या घटनेनंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
https://x.com/ANI/status/1882976917055492249?t=vEgy84IWOX647hufz3yojw&s=19
https://x.com/CMOMaharashtra/status/1882833846108041384?t=qscLwygP_0KkoZ2F0-1hyg&s=19
राज्य सरकारकडून आर्थिक मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील आयुध कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.
बचावकार्य पूर्ण
नागपूर रेंजचे इंस्पेक्टर जनरल दिलीप पाटील भुजबळ यांनी याबाबतची माहिती दिली आणि सांगितले की, “शुक्रवारी (दि.24) सकाळी भंडाऱ्यातील आयुध कारखान्यात मोठा स्फोट झाला. या कारखान्यातील एक लो तापमान प्लास्टिक स्फोटक तयार करणाऱ्या युनिटमध्ये हा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. शोध आणि बचाव कार्य 8 तासांत पूर्ण करण्यात आले.”
8 जणांचा मृत्यू 5 जखमी
या स्फोटाच्या वेळी 13 लोक या युनिटमध्ये काम करत होते. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत. जखमींपैकी दोन जण नागपूरमध्ये आणि 3 जण भंडाऱ्यात उपचार घेत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्याचे कलेक्टर संजय कोलटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आमची प्राथमिकता बचाव कार्य होती. ते नुकतेच पूर्ण झाले आहे. या घटनेचा पोलीस आणि संबंधित एजन्सी पुढील तपास करतील.”
https://x.com/AHindinews/status/1882825893707694084?t=e7XmR0i4wsyGvUgsf27Enw&s=19
कारखान्याकडून निवेदन जारी
आयुध कारखान्याने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, “शुक्रवारी 24 जानेवारी 2025 रोजी, सकाळी 10.40 वाजता, या कारखान्यातील एलटीपीई 23 नंबर इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट झाल्यानंतर कारखान्याचे बचाव आणि मदत पथक, अग्निशामक दल आणि वैद्यकीय पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांचे पथकही तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी मदत केली.”
चौकशी समिती स्थापन
तसेच “घटनास्थळी लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यापैकी 5 जणांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेले गेले असून, त्यांना योग्य वैद्यकीय मदत दिली जात आहे. या दुर्दैवी घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची कारणे तपासण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे,” असेही कारखान्याने या निवेदनात म्हटले आहे.