रांची, 05 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या पोस्टवरून महेंद्र सिंग धोनी या आयपीएलमध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे धोनीच्या या पोस्टबाबत सध्या अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
धोनीने पोस्टमध्ये काय म्हटले?
महेंद्र सिंग धोनीने फेसबूकवर एक पोस्ट शेयर केली होती. यामध्ये त्याने म्हटले होते की, “नव्या सीझनची आणि नव्या भूमिकेची वाट पाहू शकत नाही. संपर्कात रहा!” दरम्यान, या पोस्टमध्ये धोनीने त्याची नवीन भूमिका कोणती असेल? याचा खुलासा केलेला नाही. अशा परिस्थितीत धोनी कोणती नवी घोषणा करणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्याच्या या पोस्टवरून धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचे कर्णधारपद सोडणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र, याविषयी आताच सांगणे कठीण आहे. धोनीची पोस्ट
चेन्नईला पाचवे विजेतेपद मिळवून दिले होते
तत्पूर्वी, 2022 च्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाने महेंद्र सिंग धोनी ऐवजी रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते. मात्र, त्यावर्षी चेन्नई संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. त्यामुळे चेन्नईने महेंद्र सिंग धोनीला पुन्हा एकदा संघाचे कर्णधार केले होते. त्यानंतर 2023 च्या आयपीएल स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वात खेळताना चेन्नईने आयपीएलचे 5 वे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत देखील धोनीनेच चेन्नईचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा त्याचे चाहते करीत आहेत.