बीड, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यांनी दिलेली ही मुदत उद्या संपणार आहे. तर जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यापेक्षा कृती करा. सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा. असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
सरकारने ठरवले तर एका मिनिटात पण आरक्षण देता येईल. मात्र, त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. या सरकारने आम्हाला वेड्यात काढले आहे. सरकारच्या हातात आणखी 2 दिवस आहेत. आता सरकारला यापुढे वेळ देणार नाही. आम्ही सरसकट आरक्षणावर ठाम आहोत. त्यामुळे आमची पुढील भूमिका आजच्या सभेतच सांगणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
आजच्या सभेत मी सगळं काही सांगणार आहे. एकाच शब्दावर किती दिवस चर्चा करायची? त्यामुळे सरकारने मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घ्यावा. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण मागत आहोत. सरकार दिलेला शब्द पाळत नाही. गुन्हे मागे घेण्याचा त्यांनी शब्द दिला होता. त्यांनी हा शब्द अजून पाळला नाही. उलट लोकांना आता नोटीसा दिल्या जात आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्याने घ्यावे. मराठ्यांनी अजून किती दिवस अन्याय सहन करायचा? आम्ही आता अन्याय सहन करणार नाही. आम्हाला आरक्षण पाहिजेत आणि आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ही सभा 100 एकर परिसरात पार पडणार आहे. या सभेला मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारला मराठा आरक्षण लागू करण्यासाठी दिलेली मुदत उद्या संपणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलन संदर्भात आज घोषणा करणार का? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.