भिगवन येथील बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीच्या वतीने जागतीक पर्यावरण दिनानिमित्त मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच काव्यात्मक स्लोगन स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्या स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा कंपनी आवारात नुकताच आयोजित केला होता. त्याप्रसंगी नागेंद्र भट बोलत होते.
पर्यावरणाचं अतोनात अधोगती झाल्याचे सांगताना भट पुढे म्हणाले, बदलती जीवनशैली, वाढत्या शहरीकरणामुळे होणारी प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद वापर, बांधकामासाठी टेकड्या पर्वतांचे खोदकाम, वाढते प्रदूषण यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होताना दिसतात. या सगळ्यांना आळा घालण्यासाठी पर्यावरणाचे जतन करण्यासाठी सर्वांनी संकल्प केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या आयोजित बक्षीस वाटपाच्या कार्यक्रमास बिल्ट ग्राफिक कंपनीचे मनुष्यबळ प्रशासन विभाग प्रमुख बाळासाहेब सोनवणे, इंजिनिअरिंग प्रमुख धरणेंद्र गांधी, पॉवर प्लांट विभाग प्रमुख आण्णासाहेब जाधव, अकाउंट विभाग प्रमुख जसविंदरसिंह मुंजाळ या प्रमुखांसह दोनशेहून अधिक कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब सोनवणे, डी पी गांधी यांनीही पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आपले मार्गदर्शनपर मत व्यक्त केले. यावेळी पर्यावरण विभाग प्रमुख बी. बी. पाटील यांनी पर्यावरण अहवाल सादर करताना त्यांच्या विभागाने पर्यावरण संरक्षणासाठी कोणकोणती कामे केली याचा गोषवारा सादर केला. तसेच कंपनीच्या आवारात दीडशेहून अधिक वृक्षांची वृक्षारोपण करण्यात आल्याचे सांगितले. सदर बक्षीस सोहळा व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी पर्यावरण विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर प्रास्तविक भिडे यांनी केले.