22 जानेवारी रोजी सर्वांनी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी, पंतप्रधान मोदींचे आवाहन

अयोध्या, 30 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्यासह उत्तर प्रदेश राज्यातील 15 हजार 700 कोटींहून अधिक रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधान मोदींनी याठिकाणी जाहीर सभेच्या माध्यमातून लोकांना संबोधित केले. देशभरातील लोकांनी 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1741034574908723456?s=19

“आज संपूर्ण जग 22 जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण राम मंदिराचा अभिषेक सोहळा 22 जानेवारीला अयोध्येत होणार आहे.” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत. “देशाच्या इतिहासात 30 डिसेंबर ही तारीख अत्यंत ऐतिहासिक आहे. या दिवशी 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वज फडकावला आणि भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती,” असे पंतप्रधान म्हणाले.



“आज याठिकाणी 15 हजार कोटींहून अधिक किमतीच्या विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे. या पायाभूत सुविधांशी संबंधित कामांमुळे पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर अभिमानाने आधुनिक अयोध्येची स्थापना होईल. आजचा भारत आपल्या तीर्थक्षेत्रांचे सुशोभीकरण करत आहे आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगात देखील मग्न आहे. तसेच अयोध्येच्या विकासामुळे येथील लोकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1741036341780197736?s=19

“22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत यावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की, प्रत्येकाला येणे शक्य नाही. त्यामुळे मी सर्व राम भक्तांना विनंती करतो की, 22 जानेवारीला औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर नागरिकांनी त्यांच्या सोयीनुसार अयोध्येत यावे. त्यांनी 22 जानेवारीला अयोध्येत येण्याचे मन बनवू नये,” अशी विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आला आहे. आपल्याला देशासाठी नवा संकल्प घ्यायचा आहे. आपल्याला स्वत:ला नव्या ऊर्जेने भरायचे आहे. त्यासाठी सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *