मोहोळ, 24 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सध्या मराठा समाजाच्या वतीने आज राज्यभरातील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पंढरपूर रस्त्यावर मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी या रास्ता रोको आंदोलनात चक्क नवरा-नवरी वऱ्हाडी मंडळींसह सहभागी झाले. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
https://twitter.com/imganesh_barde/status/1761297679676785126?s=19
नवरा-नवरीच्या ‘रास्ता रोको’ ची सर्वत्र चर्चा
दरम्यान, पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर आज सकाळी रास्ता रोको आंदोलन सुरू होते. त्यावेळी लग्नाचे वऱ्हाड याच रस्त्यावरून जात होते. मात्र, याठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे नवरा-नवरी यांनी लग्न समारंभाला न जाता या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर वऱ्हाडी मंडळी देखील या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी ह्या नवरा-नवरीने डोक्यावर मुंडावळ्या आणि लग्नाच्या पोशाखात रास्ता रोको आंदोलन केले. प्रमोद टेकळे आणि प्रियांका मुळे असे या नवरा-नवरीचे नाव आहे. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करून मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी या नवरदेवाने यावेळी केली आहे.
विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन
तत्पूर्वी, मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी आज राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचे मराठा समाजाला आवाहन केले होते. त्यानूसार, आज राज्यातील अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.