दिल्ली, 20 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतात कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि वैद्यकीय विभागाच्या सचिवांची बैठक घेणार आहेत. या चर्चेमध्ये वैद्यकीय विभागाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत आरोग्य व्यवस्था आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना यासंदर्भात चर्चा होणार आहे.
https://x.com/ANI/status/1737335727686652169?s=20
भारतात सोमवारी 288 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात सध्या कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 970 इतकी झाली आहे. भारतात सध्या केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 115 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता दीड हजारांहून अधिक झाली आहे. याठिकाणी कोरोनाच्या 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच महाराष्ट्रात कालच्या दिवशी कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 35 झाली आहे. यामध्ये मुंबईत 27 रुग्ण, पुणे 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते देशातील वैद्यकीय व्यवस्था, ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड, व्हेंटिलेटर, औषधे, वैद्यकीय उपचार आणि उपाययोजनांच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता अलर्ट जारी केला आहे. यामध्ये त्यांनी कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत.