दुसऱ्या कसोटीत भारताकडून इंग्लंडचा 106 धावांनी पराभव; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

विशाखापट्टणम, 05 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारताने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. सोबतच भारताने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. विशाखापट्टणम येथील या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांत संपुष्टात आला. यामध्ये इंग्लंडच्या जॅक क्रॉलीने दुसऱ्या डावात इंग्लंडकडून सर्वाधिक 73 धावा केल्या. तर भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह या सामन्याचा सामनावीर ठरला.

https://twitter.com/BCCI/status/1754429363234414681?s=19

पहिल्या डावात जैस्वालचे द्विशतक

तत्पूर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या. यामध्ये भारताच्या यशस्वी जैस्वालने शानदार द्विशतक झळकावून 209 धावा केल्या. त्याने या खेळीत 19 चौकार आणि 7 षटकार लगावले. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव केवळ 253 धावांत आटोपला. इंग्लंडच्या जॅक क्रॉलीने पहिल्या डावात देखील इंग्लंडकडून सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.

भारताचे इंग्लंडसमोर 399 धावांचे आव्हान

त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. यामध्ये भारताच्या शुभमन गिल याने सर्वाधिक 104 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडसमोर 399 धावांचे आव्हान ठेवता आले. 399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाची पहिली विकेट 50 धावसंख्या असताना पडली. यावेळी त्यांचा सलामीवीर बेन डकेट 27 धावा करून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर जॅक क्रॉली आणि रेहान अहमद यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. त्यावेळी रेहान अहमद 23 धावांवर बाद झाला. त्याला अक्षर पटेलने पायचीत बाद केले. पहिल्या कसोटीत 196 धावांची खेळी करणाऱ्या ओली पोपला यावेळी 23 धावाच करता आल्या. त्याने या खेळीत 5 चौकार ठोकले.

जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर!

त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. यामध्ये जॉनी बेअरस्टो 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स 11 धावांवर असताना धावबाद झाला. तो श्रेयस अय्यरच्या थ्रोवर बाद झाला. तो बाद झाल्यावर बेन फॉक्स 36 आणि टॉम हार्टली 36 धावा करून बाद झाले. अशाप्रकारे इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे भारताने हा सामना 106 धावांनी जिंकला. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान या कसोटीचा जसप्रीत बुमराह हा सामनावीर ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *