भिगवण, 07 फेब्रुवारी: तक्रारवाडी गावातील बारामती-राशीन रोड लगत असणारे अतिक्रमण मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला होता. यामुळे ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत आक्रमक भूमिका घेतली. तसेच संबंधित ठिकाणी असलेले अतिक्रमण काढून तिथे नवीन गाळे बांधण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
ग्रामसभेत अतिक्रमणाचा मुद्दा
26 जानेवारी रोजी झालेला ग्रामसभेत अतिक्रमणाचा मुद्दाच चांगलाच गाजला. तर रोड लगत असणारे अतिक्रमण काढून संबंधित जागेवर कायदेशीर रित्या नवीन गाळे बांधावेत अशी मागणी गावातील लोकांनी ग्रामसभेत केली. तसेच संबंधित अतिक्रमण 15 फेब्रुवारी पर्यंत काढून त्याठिकाणी नवीन गाळे बांधावेत अशीही मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली आहे. मात्र आता दिलेल्या वेळेचा कालावधी संपत आला असून संबंधित ठिकाणी कोणतीही कारवाई दिसून येत नाही.
उपोषणाचा इशारा
तसेच, 15 फेब्रुवारीपर्यंत ग्रामपंचायतीने अतिक्रमणावर कोणतीही कारवाई केली नाही, तर ग्रामपंचायत समोर उपोषण करू असा इशारा गावातील तरूणांनी दिला आहे. तसेच संबंधित जागेवर आता जे अतिक्रमण धारक आहेत ते गावातील गाळे बांधावेत अशी मागणी करणाऱ्या तरुणांवर नाराज झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच आगामी काळात या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन गावात हाणामारी किंवा खून होण्याची शक्यता आहे. जर भविष्यात असे काही झाले तर संबंधित घटनेला स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, असेही तरुणांकडून बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने सर्वांना विश्वासात घेऊन लवकर गाळे बांधावेत अशी मागणी गावातील तरूण करत आहेत.
उर्वरित अतिक्रमण कधी निघणार?
अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देऊन देखील संबंधित अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढले नाही. पण सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवण यांनी नोटीस दिल्यानंतर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण निम्मे आर्धे अतिक्रमण काढले. आता उर्वरित अतिक्रमण ग्रामपंचायत कधी काढणार? असे प्रश्नचिन्ह गावकऱ्यांच्या मनात आहे. तसेच ग्रामसभेत ऑन कॅमेरा रेकॉर्डिंग झालेले ठराव अधिकृतरित्या (प्रोसेडिंगवर) तयार करण्यात आला नाही. ग्रामसेवक कोणाच्या दबावाखाली ऑन कॅमेरा रेकॉर्डिंग झालेल्या विषयाचे प्रोसेडिंग तयार करीत नाहीत, तयार केलेच तर झालेले विषय प्रोसेडींगवर असतील का याबाबत ग्रामस्थांमध्ये शंका आहे. प्रोसेडींगबाबत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्याशी वारंवार बातचीत करून देखील त्यांच्याकडून याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
ग्रामपंचायत नव्याने गाळे बांधणार?
दरम्यान, ग्रामपंचायत जर अतिक्रमणधारकांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर ही अन्याय न होता सर्वांना रोजगाराची समान संधी उपलब्ध व्हावी म्हणून झालेले अतिक्रमण काढून नव्याने गाळे बांधणार असेल तर ती आनंदाची बाब आहे. यामुळे गावातील तरुणांना व्यवसायाची आणि रोजगाराची संधी मिळेल. तसेच ग्रामपंचायतचे आर्थिक उत्पन्न वाढेल, असे मत गावकरी व्यक्त करत आहेत.