दिल्ली, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. तसेच त्यांनी ईव्हीएम वरील मतमोजणी आणि मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्न उपस्थित केले होते. या मुद्द्यावरून सध्या राज्याचे राजकीय वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. ईव्हीएम वरून सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला चर्चेसाठी बोलावले आहे.
https://x.com/ANI/status/1862757630051328390?t=cglW73BkvKpy4W-B0EgK9w&s=19
मतदान प्रक्रिया पारदर्शक: निवडणूक आयोग
विधानसभा निवडणुकीतील सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाला 3 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नसल्याचा पुनरुच्चार यावेळी निवडणूक आयोगाने केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे सर्व प्रश्न आणि शंका ऐकून घेतल्यानंतर त्यावर लेखी उत्तर देण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे. याशिवाय राजकीय पक्षांच्या सहभागासह मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया देखील पारदर्शक पद्धतीने पार पडली होती असे देखील याप्रसंगी निवडणूक आयोगाने म्हटले आहे. सोबतच निवडणूक आयोगाने काँग्रेसला त्यांच्या सर्व न्याय्य प्रश्नांचे आणि शंकांचे पुढील परीक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसने केली होती तक्रार
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला 230 जागा आणि महाविकास आघाडीला 46 जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएम वरील मतमोजणीवर शंका उपस्थित केली होती. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत. यासंदर्भात काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आता काँग्रेस पक्षाला चर्चेसाठी बोलावले आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.