मुंबई, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे गुरूवारी (दि.05) सायंकाळी येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का? असा प्रश्न निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार नव्हते. परंतु, उदय सामंत यांच्या घोषणेमुळे एकनाथ शिंदे हे आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
https://x.com/ANI/status/1864606178208305196?t=DeF-dTBSUJTL9xT9sLBiNA&s=19
https://x.com/samant_uday/status/1864584958775591259?t=FFTcQhOWmG3ixdosOMu-wg&s=19
उदय सामंत यांची पत्रकार परिषद
तत्पूर्वी, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यास इच्छुक नव्हते. परंतु, शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची बराच वेळ समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यश आले आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्याच्या काही तास अगोदर शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ न घेतल्यास शिवसेनेचा एकही नेता उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले होते. शिवसेनेच्या एकाही आमदाराची उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नसून, या पदावर फक्त आमचे नेते एकनाथ शिंदे हेच असावेत, असे देखील त्यांनी सांगितले होते. शिवसेना नेत्यांच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे हे अखेर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास राजी झाले आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार
दरम्यान, राज्य सरकारचा आज (दि.05) सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची घेतील. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नेते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार असून येत्या काही दिवसांत इतर खात्याच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.