उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

ठाणे, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावरून जीवे धमकी देणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी श्रीनगरमध्ये राहतो आणि त्याने नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याने आपल्या मित्राचा मोबाईल वापरून इन्स्टाग्रामवर हा धमकीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्याने एकनाथ शिंदे यांना उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. या घटनेमुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून सहा पथके तैनात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला घोटीपाडा परिसरातून अटक केली आहे.

https://x.com/ANI/status/1876230327003406630?t=STf_RpQLtX3EwSmkagW-7Q&s=19

पोलिसांनी दिली माहिती

या आरोपीने एकनाथ शिंदे यांना इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. याप्रकरणी शिवसेना पक्षाकडून श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला आणि 12 तासांत आरोपीला अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या आरोपीला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासानंतरच त्याने असे कृत्य का केले असावे? यामागील कारण स्पष्ट होईल, असे ठाणे शहर डीसीपी प्रशांत कदम यांनी सांगितले.

सोशल मीडियाचा गैरवापर

दरम्यान, या प्रकारामुळे सोशल मीडियाच्या गैरवापराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर कृतींना खतपाणी घालणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाईची गरज असल्याचे म्हटले जात आहे. अशा प्रकारच्या घटना शासकीय जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींसाठीही त्रासदायक ठरतात. तसेच अशा घटना समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतातच, शिवाय यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे लक्षात घेता नागरिकांनी सोशल मीडियाचा उपयोग करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच सोशल मीडियावरून धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे किंवा समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या कृतींवर कायद्यात कठोर कारवाईची तरतूद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *