मुंबई, 17 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा रस वापरण्यास साखर कारखान्यांना परवानगी मिळाली आहे. राज्यातील साखर उद्योगाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी केंद्राने ही बंदी मागे घेताना 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1736322253946859784?s=19
“उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकार तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे मी मनापासून आभार मानतो. साखर उत्पादन आणि ऊसापासून तयार होणाऱ्या अन्य उत्पादनांच्या निर्मितीमध्ये समतोल राखण्यासाठी केंद्राने काही दिवसांपूर्वी निर्बंध आणले होते. त्यावर राज्यातील ऊस उपलब्धता व साखर उत्पादन याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वस्तूस्थिती समजून घेत तात्काळ प्रतिसाद दिला. यामुळे साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वय आणि सुसंवादामुळे शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात कुठलीच अडचण येत नाही. आपण सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे तसेच केंद्र सरकार आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले पाहिजे.” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी परिपत्रक काढून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांनी विरोध केला होता. मात्र इथेनॉल निर्मिती बंदीच्या निर्णयावरील वाढता विरोध लक्षात घेता, केंद्र सरकारने त्यांचा हा निर्णय काल मागे घेतला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांना दिलासा मिळाला आहे.