मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे या नेत्यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून, लोकशाही बळकट व्हावी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी आवर्जून मतदान करावे असे आवाहन याप्रसंगी मतदारांना केले.
https://twitter.com/mieknathshinde/status/1792446224668180680?s=19
https://twitter.com/ANI/status/1792426259504582706?s=19
राज ठाकरे काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज मुंबईत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांनी देखील याठिकाणी मतदान केले. यावेळी मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आताच मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. त्यामुळे या वेळेत जास्तीत जास्त मुंबईकर घराबाहेर पडून मतदान करतील, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/OfficeofUT/status/1792441889330987190?s=19
उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले. याप्रसंगी, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची मतदान असलेल्या मतदारसंघात भाजपचे उज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याची चर्चा रंगली आहे.