मुंबई, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जात आहेत. या मतमोजणीचे कल आता समोर आले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार महायुती सर्वाधिक 216 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप सर्वाधिक 125 जागांवर आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष 56 जागांवर आघाडीवर आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष 39 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी 53 जागांवर आघाडीवर आहेत. यात काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1860218713653547227?t=6rdcZQOz6JmOVjukMl-etQ&s=19
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुती मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. “एक है तो ‘सेफ’ है! मोदी है तो मुमकिन हैं!” असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार भाजप 125 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सध्या ते मोठा जल्लोष करताना दिसत आहेत. भाजपला मिळालेल्या या मोठ्या आघाडीमुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
मुख्यमंत्री कोण होणार?
आतापर्यंत मिळालेल्या कलांनुसार राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार येणार असल्याची दाट शक्यता आहे. परंतु, या निवडणुकीचा अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. यामधील बहुतांश जागांवरील मतमोजणी अजून सुरू आहे. ही मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच कोणता पक्ष किती जागांवर विजयी ठरतो? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता नव्या सरकारच्या स्थापनेकडे आणि मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.