मुंबई, 14 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ईद-ए-मिलाद सणाबाबत महत्त्वाची बातमी आहे. ईद-ए-मिलाद सणाच्या सार्वजनिक सुट्टीत बदल करण्यात आला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर याठिकाणी ईद-ए-मिलाद सणानिमित्त 16 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली होती. परंतु, ही सुट्टी आता बुधवारी म्हणजेच 18 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
https://x.com/ANI/status/1834796517158494616?s=19
18 सप्टेंबर रोजी जुलूस कार्यक्रम
दरम्यान, यंदा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्याचवेळी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण पार पडणार आहे. यादिवशी गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाते. या पार्श्वभूमीवर, दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखला जावा, या हेतूने यंदा मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांतील मुस्लिम धर्मियांनी ईद-ए-मिलाद निमित्त 18 सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात ईद-ए-मिलाद ची सुट्टी 18 तारखेला द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
18 तारखेला सुट्टी
त्यानुसार, ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुंबई शहर व उपनगर या भागात 16 सप्टेंबर रोजी देण्यात येणारी सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती 18 सप्टेंबर रोजी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भातील आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची तारीख विचारात घेऊन त्याठिकाणी 16 सप्टेंबर रोजी देण्यात येणारी सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून ती 18 सप्टेंबर रोजी देण्यासंदर्भातील निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.