पुणे, 15 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने कच्चे पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात 20 टक्क्यांची वाढ केली आहे. तसेच रिफाईंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील आयात शुल्क देखील 12.50 टक्क्यांवरून 32.50 टक्के करण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम खाद्यतेलांच्या किंमतीवरही झालेला पहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किमतीत प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे.
खाद्यतेलांच्या किमती वाढल्या
तत्पूर्वी, केंद्र सरकारने शनिवारी (दि.14) खाद्यतेलांच्या आयात शुल्कात 20 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे लगेचच देशातील खाद्यतेलांच्या किमती वधारल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किमतीत सध्या प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाली. त्यानुसार, सोयाबीन तेलाची किंमत सध्या प्रति किलो 110 रुपयांवरून 130 रुपये झाली आहे. सूर्यफुल तेल प्रति किलो 115 रुपयांवरून 130 रुपये आणि शेंगदाणा तेल 175 रुपयांवरून 185 रुपये झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!
देशात आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. सध्या गणेशोत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा केला जात आहे. तसेच नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी हे सण देखील जवळ आले आहेत. नवरात्री उत्सवात उपवासाचे पदार्थ तयार केले जातात. तसेच दिवाळीच्या काळात घरोघरी फराळ केला जातो. त्यासाठी खाद्यतेलाला सर्वत्र मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, सणासुदीच्या तोंडावर तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, खाद्यतेलांच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर लगेचच खाद्यतेलांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात खाद्यतेलांच्या किमतीत आणखी वाढ होते की काय? याची काळजी सध्या सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.