मुंबई, 29 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. कथित कोविड खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना समन्स पाठवले आहे. त्यानुसार, अमोल कीर्तिकर यांना 8 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दरम्यान, अमोल कीर्तिकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबई वायव्य मतदार संघात उमेदवारी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ईडीने त्यांना समन्स बजावल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काळजी वाढली आहे.
https://twitter.com/ANI/status/1773612576829485422?s=19
यापूर्वीही समन्स बजावले होते
तत्पूर्वी, अमोल कीर्तिकर यांना ईडीने पाठवलेले हे दुसरे समन्स आहे. याच्याआधी ईडीने त्यांना कोविड खिचडी घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी अमोल कीर्तिकर हे काही कारणास्तव चौकशीसाठी ईडीसमोर हजर होऊ शकले नव्हते. त्यानंतर ईडीने आता त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. त्यामुळे अमोल कीर्तिकर हे आता चौकशीसाठी हजर राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेची अडचण वाढणार?
कोरोनाच्या काळात तत्कालीन सरकारच्या वतीने स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्याची योजना राबविण्यात आली होती. या योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. याप्रकरणाची सध्या ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. तर ईडीच्या चौकशीला अमोल कीर्तिकर हे सहकार्य करणार का? याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी अमोल कीर्तिकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई वायव्य मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अशातच ईडीच्या या समन्समुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अडचण वाढली आहे.