बारामती, 19 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कंपनी आणि त्यांच्याशी सबंधित काही संस्थांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आता ईडीने रोहित पवार यांना समन्स पाठवून चौकशीसाठी 24 जानेवारी रोजी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. याविषयी रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1748349333047509236?s=19
रोहित पवार या ट्विटमध्ये काय म्हणाले?
“ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन आणि मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. ईडीला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर, 24 तारखेऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ईडी ही विनंती मान्य करेल,” असे रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे ईडी त्यांची ही विनंती मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ईडीने 6 ठिकाणांवर छापा टाकला होता
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनी आणि त्यांच्याशी संबंधित 6 ठिकाणांवर एकाचवेळी छापा टाकला होता. यावेळी ईडीच्या पथकाने या कंपनीतील कागदपत्रांची छाननी केली होती. त्यानंतर ईडीने आज रोहित पवार यांना समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.