रोहित पवारांना ईडीचा धक्का! बारामती ॲग्रोचा हा साखर कारखाना जप्त

मुंबई, 08 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. बारामती ॲग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता आज ईडीने जप्त केली आहे. छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड सहकारी हा साखर कारखाना रोहित पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीने 50 कोटी रुपयांना खरेदी केला होता. कर्जाचा बोजा वाढल्यामुळे त्यावेळी कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी बारामती अ‍ॅग्रो कंपनीने हा कारखाना विकत घेतला होता.

कारखान्याची संपत्ती ईडीने जप्त केली

मात्र, हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या कारखान्याची 161.30 एकर जमीन ईडीने आता PMLA अंतर्गत जप्त केली आहे. याची किंमत 50 कोटी 20 लाख रुपयांच्या घरात आहे. यासंदर्भातील माहिती ईडीने दिली आहे. याप्रकरणी रोहित पवार यांची ईडीकडून 1 फेब्रुवारी रोजी तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. तेंव्हा रोहित पवार यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1766083251402338484?s=19

कारवाईनंतर रोहित पवारांचे ट्विट

दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर रोहित पवारांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. तसेच माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? असा हसत सवाल त्यांनी विचारला आहे. पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय, असे रोहित पवारांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कारवाई विरोधात कोर्टात जाणार

“ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही,” असे रोहित पवार या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *