मुंबई, 25 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची काल महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणी ईडी चौकशी झाली. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांची तब्बल साडे दहा तास चौकशी केली. या चौकशीनंतर रोहित पवारांनी मुंबईच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर येत्या 1 फेब्रुवारी रोजी ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती देखील रोहित पवारांनी यावेळी दिली. माझे सर्व पदाधिकारी, सहकारी आज न बोलवता इथे आलेत, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे संजय भाऊ इथे उपस्थित आहेत व सर्व जिल्हाधिकारी, शहराध्यक्ष, फ्रंटलसेल या सर्वच सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
https://twitter.com/NCPspeaks/status/1750229191390585139?s=19
पवार साहेबांची मला कायम प्रेरणा राहणार: रोहित पवार
“गेल्या 7 वर्षांपासून मी राजकारणात आलेलो आहे. राजकारणात मी थोडासा नवीन असेल आणि बऱ्याच लोकांना मी बच्चा वाटतो आणि अशा परिस्थितीत एखाद्या लहान मुलाला, कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी बापमाणूस लागतो आणि ते पवार साहेब तिथे आहेत. बापाला आम्ही बापच म्हणतो. नंतर बापाचे वय कधी काढत नसतो, त्यामुळे आमचे बाप हे पवार साहेबच आहेत आणि तेच आमचे मार्गदर्शक आणि पाठबळ देण्यासाठी इथे होते आणि त्यांचा एक नातू आणि कार्यकर्ता म्हणून नेहमीच मला प्रेरणा राहणार आहे. ती कधीच बदलणार नाही,” असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
https://twitter.com/NCPspeaks/status/1750229179407143286?s=19
1 फेब्रुवारी रोजी पुन्हा चौकशी!
ईडी ऑफिसमध्ये सर्व सहकाऱ्यांनी मला उत्तम सहकार्य केले. माझ्याकडे होते तेवढे सर्व डॉक्युमेंट्स मी त्यांना दिलेले आहेत. 1 फेब्रुवारीला मला परत डॉक्युमेंट्स घेऊन बोलवले आहे. तिथे जाऊन मी त्यांना जे काही सहकार्य करायचे असेल ते करणार आहे, अशी माहिती रोहित पवारांनी यावेळी दिली. “आदरणीय पवार साहेब स्वतः वेळ काढून दिवसभर एका कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे बाप माणूस म्हणून कसे उभे राहायचे हे आज त्यांनी दाखवून दिले आहे. 12 तास ते उपस्थित होते. तसेच जयंत साहेब, सुप्रियाताई, आव्हाड साहेब आणि सर्वच पदाधिकारी त्यांचे मी आभार व्यक्त करतो,” असे रोहित पवारांनी यावेळी म्हटले आहे.