मुंबई, 01 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडीची चौकशी होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्याच्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी रोहित पवार यांची ईडीकडून 24 जानेवारी रोजी चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी रोहित पवारांची तब्बल 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर रोहित पवार हे आज पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत.
https://twitter.com/NCPspeaks/status/1752658990113472580?s=19
राष्ट्रवादीकडून आज घंटानाद आंदोलन
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी मुंबईच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या पुन्हा एकदा होणाऱ्या ईडी चौकशीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. “रोहित पवार यांची 24 जानेवारी रोजी ईडीद्वारे तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आपापल्या विभागात जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाबाहेर घंटानाद करावा,” असे आवाहन विद्या चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
तर रोहित पवारांची चौकशी झालीच नसती: विद्या चव्हाण
तसेच ही चौकशी सूडबुद्धीने केली जात आहे. रोहित पवार हे बेरोजगारीचा प्रश्न, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा, धनगर, लिंगायत यांच्यासाठीचं आरक्षण यांवर आवाज उठवत असल्याने सरकार अडचणीत येत आहे. रोहित पवार हे अजित पवार मित्रमंडळासोबत गेले असते तर ही चौकशी लागली नसती, हे त्रिकालबाधित सत्य असल्याचे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. सोबतच या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही काही ठराविक लोक उपोषण करणार आहोत. रोहित पवार हे ईडी कार्यालयात गेल्यानंतर ते बाहेर येईपर्यंत आम्ही अन्नत्याग करणार आहोत,” अशा विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.