मुंबई, 07 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्या संदर्भात मोठी बातमी आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (दि.07) देशभरात ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांच्या प्रमुख विक्रेत्यांशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यामध्ये ईडीने देशातील मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद आणि हरियाणा यांसारख्या शहरांसह 19 ठिकाणी छापेमारी करून शोध मोहीम राबविली. ईडीने कथित परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत ही कारवाई केली आहे. या विक्रेत्यांवर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
https://x.com/AHindinews/status/1854478966767473041?t=waUmDqn3SyZpigQagWb2Lw&s=19
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्यांविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईडीने याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यावेळी ईडीने म्हटले की, सीसीआयला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी स्थानिक स्पर्धा नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांनी काही निवडक विक्रेत्यांना प्राधान्य देऊन आणि उत्पादनांवर भरघोस सूट दिल्याने स्पर्धा नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे इतर संबंधित कंपन्यांचे नुकसान झाले आहे. स्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) अविश्वास तपासात ही बाब समोर आली आहे.
फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या त्या विक्रेत्यांनी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केले आहेत का? याचा सध्या ईडी तपास करत आहे. याची खात्री करण्यासाठी ईडी सध्या त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून आहे. कथित मनी लाँड्रिंगचे कनेक्शन आणि त्यासंदर्भातील पुरावे शोधणे हा ईडीच्या या शोध मोहिमेमागील उद्देश आहे. ईडीच्या या कारवाईनंतर ई-कॉमर्स क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाई संदर्भात दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.