नागपूर, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) तेलंगणामध्ये आज (दि.04) सकाळी भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे बुधवारी सकाळी 7.27 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा प्रभाव दूरपर्यंत दिसून आला आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर महाराष्ट्राच्या काही भागात देखील भूकंपाचे हादरे बसले आहेत. आज सकाळी नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर यांच्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://x.com/ANI/status/1864130476245700961?t=u1YfmfFUsmRRY65ta7OlxQ&s=19
https://x.com/SDMAMaharashtra/status/1864180443148636299?t=LJC4A8DwOzGjBZMaInSRIQ&s=19
राज्यातही भूकंपाचे सौम्य धक्के
या भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणात असून महाराष्ट्राच्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा जिल्हांमध्ये सौम्य धक्के जाणवले आहेत. यामध्ये कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. तसेच याठिकाणी भूकंप पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि त्यांनी घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, हा भूकंप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
https://x.com/balaji25_t/status/1864133503027417216
तेलंगणात भूकंपाचा मोठा धक्का
तत्पूर्वी, तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यात आज सकाळी 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्याचे केंद्र मुलुगु परिसरात जमिनीपासून 40 किलोमीटर खोल नोंदविण्यात आले आहे. अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. तर प्रशासनाकडून सध्या येथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, तेलंगणात गेल्या 20 वर्षात झालेल्या भुकंपांपैकी हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे तेलंगणाच्या हवामान अधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. यावेळी संपूर्ण तेलंगणासह हैदराबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.