नांदेड, 22 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी आज (दि.22) सकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किमी दूर उत्तरपूर्व दिशेला असल्याचे नोंदविण्यात आले आहे. तर या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://x.com/SDMAMaharashtra/status/1848611389298126895?t=3LBeD9E-kHR8o5Urdt0mnQ&s=19
https://x.com/InfoNanded/status/1848564250765078773
भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल
नांदेड शहरासह जिल्ह्यातील अर्धापूर आणि हदगाव या तालुक्यात आज सकाळी 6:52 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्र हदगाव तालुक्यातील सावरगाव असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली आहे. दरम्यान, सकाळी झोपेत असतानाच हा भूकंप झाल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
यापूर्वी आसाम, हिमाचल प्रदेशात भूकंप झाला होता
यापूर्वी, आसामच्या उत्तर-मध्य भागात रविवारी (दि.13) सकाळी 4.2 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार गुवाहाटीपासून सुमारे 105 किमी उत्तरेस या भूकंपाचे केंद्र होते. तसेच हिमाचल प्रदेशात देखील मंगळवारी (दि.15) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल नोंदविण्यात आली आहे.