बारामती, 18 एप्रिल: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर अजित पवार यांनी देखील आज बारामती मतदार संघातून डमी उमेदवारी अर्ज भरला आहे. याप्रसंगी शिवसेना नेते विजय शिवतारे आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर खबरदारी म्हणून अजित पवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीकडून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी त्यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांचा पर्यायी उमेदवारी अर्ज
सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला तर, ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधावा लागू नये म्हणून महायुतीकडून अजित पवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांचा हा पर्यायी उमेदवारी अर्ज असणार आहे. परंतु, तशी गरज भासली नाही तर अजित पवार हे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती मतदार संघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या पार्श्वभूमीवर, महायुतीकडून उमेदवारीबाबत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तत्पूर्वी, महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील आज बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बारामतीत यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. ही लढत अटीतटीची होणार असल्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे.