पुणे, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील हडपसर परिसरात रविवारी (दि.11) एक युवक दारूच्या नशेत रस्त्यावर एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. त्याठिकाणी हडपसर वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार राजू पवार हे ड्युटीवर होते. त्यांनी या युवकाला थांबवण्यासाठी आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण युवकाने उलट त्यांनाच मारहाण केली. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी युवकाला पकडून त्याला अटक केली. या घटनेनंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (दि.13) पोलीस अंमलदार राजू पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
https://x.com/PuneCityPolice/status/1878784207994188279?t=MKXgK_dWX8l7HkcfQpICJQ&s=19
वाहतूक अंमलदाराच्या घरी पोलीस आयुक्तांची भेट!
यावेळी अमितेश कुमार यांनी राजू पवार यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. तसेच वाहतूक पोलीस अंमलदार राजू पवार यांना यावेळी गौरविण्यात आले. पोलीस आणि नागरिक समाजाचे घटक आहेत. नागरिक देखील साध्या वेशातील पोलिसच आहेत. आपल्या शहरासाठी प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. जर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसावर कोणी हल्ला करेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, पुण्यातील हडपसर परिसरात 11 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक युवक दारूच्या नशेत असताना रस्त्यावर एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. त्याच वेळी तो युवक रस्त्यावरून जात असलेल्या इतर लोकांवरही दगड फेकून मारत होता. हडपसर वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार राजू पवार हे त्याठिकाणी ड्युटीवर होते. त्यांनी त्या युवकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतू या युवकाने त्यांना देखील मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली. या आरोपीवर पुढील कारवाई सुरू आहे.
या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी आणि कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी गंभीर चिंता निर्माण करत आहे. पोलीस आपले काम करत असताना जर त्यांच्यावर हल्ला होत असेल, तर हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरते. त्यामुळे नागरिकांनीही जागरूक राहणे आणि पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे.