मुंबई, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 880 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याची किंमत 9 कोटी रुपयांच्या घरात आहे. या संदर्भातील माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तर सध्या या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1743829764140564857?s=19
कोकेनच्या 88 कॅप्सुल जप्त
काल मध्यरात्री 2:45 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिकारी गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना एक परदेशी नागरिक संशयास्पदरित्या हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्याची तपासणी केल्यानंतर या व्यक्तीकडे कोकेन या अंमली पदार्थाच्या 88 कॅप्सुल असलेली पिशवी सापडली. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने हे कोकेन साकीनाका येथील हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका विदेशी नागरिकाकडून घेतल्याचे उघड झाले.
दोन परदेशी पोलिसांच्या ताब्यात
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लगेचच सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी साकीनाका येथील हॉटेलमध्ये छापा टाकून या प्रकरणातील दुसऱ्या परदेशी नागरिकाला अटक केली. साकीनाका पोलिसांनी या कारवाईत 880 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची किंमत अंदाजे 9 कोटी रुपये इतकी आहे. तर सध्या या दोन्ही परदेशी नागरिकांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.