दिल्ली, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी सन्माननीय जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यांची ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. याचा स्पष्ट उल्लेख पीआयबीच्या निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाटावर सध्या अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
https://x.com/PIB_India/status/1872870991996830097?t=7pGBnNIGbvdIaP1pRoZpyg&s=19
अमित शहा काय म्हणाले?
याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून स्मारकासाठी जागा निश्चित केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यावेळी अमित शहा त्यांना म्हणाले की “स्मारकासाठी जागा निश्चित होण्यासाठी थोडा वेळ लागेल. तोपर्यंत अंतिम संस्कार आणि इतर धार्मिक विधी नियोजित ठिकाणी करता येतील.” मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करून त्याला जागा प्रदान करण्याची प्रक्रिया सरकार लवकरच सुरू करेल, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
https://x.com/INCIndia/status/1872633103707222155?t=V17MxVYFKZTGgM7mYY4BjQ&s=19
मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती
काँग्रेसनेही डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतींना सन्मान मिळावा, यासाठी स्मारकाला वेगळे महत्त्व असल्याचे म्हटले आहे. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील आर्थिक धोरणे आणि शांततापूर्ण राजकारण हे देशासाठी दिशादर्शक ठरले आहे, अशी अनेकांची भावना आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी उभारले जाणारे स्मारक हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.