पंतप्रधानांच्या हस्ते आज नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन

दिल्ली, 09 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि.09) महाराष्ट्रातील 7 हजार 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज दुपारी 1 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच यावेळी शिर्डी विमानतळावरील 645 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

https://x.com/PIBMumbai/status/1843674250382848496?s=19

7000 कोटींचे विमानतळ

दरम्यान, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 7 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, हा प्रकल्प उत्पादन, हवाई क्षेत्र, पर्यटन, लॉजिस्टिक आणि आरोग्यसेवा यासह अनेक क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावेल. तसेच या विमानतळाचा नागपूर आणि विदर्भाच्या विस्तीर्ण प्रदेशाला मोठा लाभ मिळणार आहे.

10 सरकारी मेडिकल कॉलेजचे उद्घाटन

तसेच या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे) येथील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. ही महाविद्यालये पदवी आणि पदव्युत्तर जागा वाढवण्याबरोबरच लोकांना विशेष तृतीय श्रेणी आरोग्य सेवा देखील पुरवणार आहेत.

विविध प्रकल्पाचे उद्घाटन

भारताला ‘जगाची कौशल्यविषयक राजधानी’ म्हणून नावारुपाला आणण्याच्या त्यांच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, पंतप्रधान यावेळी मुंबईतील भारतीय कौशल्य संस्था (आयआयएस) चे उद्घाटन करतील. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक प्रशिक्षणासह उद्योगासाठी कर्मचारी तयार करण्याचा त्याचा उद्देश आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलअंतर्गत उभारण्यात आलेल्या या संस्थेची स्थापना टाटा शैक्षणिक आणि विकास निधी ही संस्था आणि भात सरकार यांच्या संयुक्त सहयोगातून करण्यात आली आहे. तसेच, पंतप्रधान यावेळी राज्यातील विद्या समीक्षा केंद्राचे (व्हीएसके) देखील उद्घाटन करणार आहेत. व्हीएसके विद्यार्थी, शिक्षण आणि प्रशासकांना स्मार्ट उपस्थिती, स्वाध्याय यांसह अशाच प्रकारच्या इतर अनेक लाईव्ह चॅटबॉटच्या माध्यमातून महत्त्वाचा शैक्षणिक तसेच प्रशासकीय डाटा सुलभतेने पुरवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *