दिल्ली, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाटावर शनिवारी (दि. 28) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि अनेक राजकीय नेते उपस्थित होते. शीख परंपरेनुसार अंत्यसंस्काराचा विधी पार पडला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांसारख्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली.
https://x.com/AHindinews/status/1872907755947999694?t=f1fmk3kLnNAw5PkBfetn1A&s=19
https://x.com/AHindinews/status/1872902673588207852?t=7GCIeve0vJzNv9CdJLlvdg&s=19
तत्पूर्वी, डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात आणण्यात आले. येथे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निवासस्थानाबाहेरही मोठ्या संख्येने नागरिकांनी येऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतील लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मनमोहन सिंग यांचा राजकिय प्रवास
डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान भारतीय राजकारण व अर्थव्यवस्थेसाठी अजरामर आहे. त्यांनी 1991 ते 1996 या काळात देशाचे अर्थमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचे नेतृत्व करताना त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवा मार्ग दाखवला. त्यानंतर, 2004 ते 2014 या काळात ते भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत प्रगती साधली. डॉ. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ विशेषतः आर्थिक संकटाच्या काळात त्यांच्या स्थिर नेतृत्वासाठी ओळखला जातो. त्यांनी आधुनिक भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या शांत, संयमी व समर्पित स्वभावामुळे ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आदराने पाहिले जात होते. डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन देशासाठी अपरिमित नुकसान असून, त्यांची उणीव कायम भासणार आहे.