यंदा माझा वाढदिवस साजरा करू नये, सुप्रिया सुळे यांचे आवाहन

बारामती, 25 जून: (विश्वजीत खाटमोडे) बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा येत्या 30 जून रोजी वाढदिवस आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पत्र लिहून यंदा आपला वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन केले आहे. माझ्या 30 जून रोजी असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणीही फ्लेक्स आणि होर्डिंग्ज आदी लावू नये, असे देखील त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

https://x.com/supriya_sule/status/1805211424823947691?s=19

सुप्रिया सुळे यांनी पत्रात काय म्हटले?

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई आहे. तर अनेक ठिकाणी चाऱ्याच्या टंचाईमुळे पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ही कठीण परिस्थिती पाहता, माझे आपल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक सर्वांना नम्र आवाहन आहे की, माझ्या 30 जून या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणीही फ्लेक्स आणि होर्डिंग्ज आदी लावू नये. तसेच विविध माध्यमातून जाहिराती करणे टाळावे. त्याऐवजी आपण सर्वांनी दुष्काळी परिस्थितीमुळे त्रस्त असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी घटकांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि गरजूंना मदत होईल अशा पद्धतीचे विधायक कार्यक्रम करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी या पत्रातून केले आहे.

सर्वांच्या शुभेच्छा सदैव माझ्यासोबत

आपणा सर्वांना तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचविण्याची इच्छा असते. अनेकांना मला भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गिफ्ट द्यायचे असते. पण यापेक्षा आपण दुष्काळ पीडित बांधवांसाठी काही करू शकलात तर याच माझ्यासाठी सर्वात मोठ्या शुभेच्छा असतील. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत, याची मला जाणीव आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी यामध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *