जेएन-1 ला घाबरू नका, मात्र सतर्क रहा – आरोग्य मंत्री

पुणे, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात कोरोनाच्या जेएन-1 या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी पुणे येथे विविध अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यातील आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. राज्यात कोरोनाच्या जेएन-1 या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना संदर्भातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तानाजी सावंत यांनी यावेळी केले. त्यासोबतच त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0Cpnf4fnYJmCdkVHQaSt8WdSVG5VjYWbE67KNEgHtj1twcFynMkoD2oYj6FEeEgJCl&id=100044334042383&mibextid=Nif5oz


या बैठकीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. जेएन-1 हा व्हेरियंट धोकादायक नसला तरी आरोग्य विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी याबाबत सतर्क राहावे. नागरिकांमध्ये अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. जेएन-1 वर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे गांभीर्याने आणि वस्तुस्थितीला धरून मॉकड्रिल करावे, अशा प्रकारच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

तसेच कोरोना संदर्भात कसलाही हलगर्जीपणा न करता आरोग्य यंत्रणा, विलागीकरण कक्ष, ऑक्सिजनची सुविधा, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय उपकरणे कार्यरत आहेत की नाही? याची प्रत्यक्ष जाऊन खात्री करावी. यावेळी त्याचे व्हिडिओ बनवून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावेत, असे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. याशिवाय राज्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्यात, तसेच कोरोनाच्या संशयित रुग्णांची चाचणी करून त्यावर लक्ष द्यावे आणि त्या रुग्णांवर उपचार करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

https://twitter.com/ANI/status/1738226378561179926?s=19

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. त्यामुळे नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरणार नाही. सोबतच प्रसारमाध्यमांनी देखील खात्री करूनच बातमी प्रसिद्ध करावी. विनाकारण चुकीची माहिती देऊन नागरिकांमध्ये भीती पसरवू नये, असे आवाहन सार्वजानिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यावेळी केले. राज्यात जेएन-1 व्हेरियंटच्या तयारीबद्दल तानाजी सावंत यांनी यावेळी अधिक माहिती दिली. राज्यात सध्या एकूण विलगीकरण बेड 22,445 इतके आहेत. तर ऑक्सिजन बेड 35,000, आयसीयू बेड सुमारे 10,000 आणि व्हेंटिलेटर बेड सुमारे 6,500 इतके आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. असे आरोग्य मंत्री म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *